
जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालातून लिंग गुणोत्तरातील चिंताजनक चित्र; सलग दोन वर्षे जन्मदरात घट
जळगाव (प्रतिनिधी): जिल्हा आरोग्य विभागाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालातून जळगाव जिल्ह्यातील जन्मदर आणि लिंग गुणोत्तराबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील जन्मदरात सातत्याने घट होत असून, हजार मुलांमागे जन्म घेणाऱ्या मुलींची संख्या अद्याप समाधानकारक पातळीवर पोहोचलेली नाही.
सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्याचा जन्मदर १.८८ होता. तो २०२४-२५ मध्ये १.७६ वर आला असून, २०२५-२६ मध्ये आणखी घसरून १.७२ इतका नोंदविण्यात आला आहे. सलग दोन वर्षे जन्मदरात झालेली घट ही आरोग्य यंत्रणेसाठी अभ्यासाचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराच्या आकडेवारीनुसार, हजार मुलांमागे केवळ ९२० मुलींचा जन्म होत असल्याची नोंद आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजना आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येत असल्या तरी अपेक्षित परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत.
जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, सुरक्षित मातृत्व आणि जनजागृती अभियानांना अधिक गती देण्यावर भर दिला जात आहे. गर्भलिंग निवड प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य तपासण्या आणि समाजप्रबोधन यांवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, जन्मदरातील घट आणि लिंग गुणोत्तरातील असमतोल या दोन्ही बाबी गांभीर्याने घेऊन जिल्हास्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत.
गेल्या तीन वर्षांतील लिंग गुणोत्तर (मुली)
| वर्ष | हजार मुलांमागे मुली |
|---|---|
| २०२३-२४ | ९१० |
| २०२४-२५ | ९२० |
| २०२५-२६ | ९२० |
जिल्ह्यातील जन्मदर
| वर्ष | जन्मदर |
|---|---|
| २०२३-२४ | १.८८ |
| २०२४-२५ | १.७६ |
| २०२५-२६ | १.७२ |



