जळगावताज्या बातम्याशेतकरी

ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

किमान आधारभूत किमतीवर विक्रीसाठी मिळणार अतिरिक्त संधी

जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शासकीय दराने ज्वारी विक्रीसाठी आणखी कालावधी उपलब्ध होणार आहे.

ज्वारी खरेदीस मुदतवाढ मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र शासनाने मुदतवाढीस मंजुरी देत अधिकृत आदेश जारी केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री जयकुमार रावळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. केंद्राने मंजुरी दिल्यानंतर खरेदी प्रक्रिया केंद्र शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी दिली.

यंदा राज्यात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र खुल्या बाजारातील दरात घसरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी दराने ज्वारी विकावी लागत होती. या पार्श्वभूमीवर मुदतवाढीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांनी शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील कमी दराला बळी न पडता शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीवरच ज्वारी विक्री करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पणन महासंघ आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button