ताज्या बातम्याजळगाव

अमळनेरमध्ये सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदानीत बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन मित्रांचा पाण्याने भरलेल्या दगडाच्या खदानीत बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र खदानीच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी सेल्फी काढताना एका तरुणाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी उर्वरित दोघांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याची खोली अधिक असल्याने तिघेही बाहेर येऊ शकले नाहीत आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबविण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रशासनाचे आवाहन

पावसाळ्याच्या काळात पाण्याने भरलेल्या खदानी, धरणे, तलाव आणि नद्यांच्या परिसरात सेल्फी काढणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button