जळगावताज्या बातम्या

‘एक भारत… एक सूर’ कार्यक्रमातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश; १६ शाळांतील हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि संगीताच्या माध्यमातून सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युनिटी इन पॅट्रियोटिझम – एक भारत… एक सूर’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील १६ शाळांतील एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल धीरज मिनोत्रा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, ज्येष्ठ गांधीवादी अब्दुलभाई, डॉ. अश्विन झाला, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष जे. के. पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची तसेच प्रकल्प प्रमुख ॲड. सागर चित्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सहभागी शाळांचा सन्मान करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात ‘स्वरांतून राष्ट्रप्रेम, गीतांतून एकात्मता’ ही संकल्पना प्रभावीपणे साकारण्यात आली. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, माणसाने माणसाशी माणसासम…, खरा तो एकचि धर्म…, झेंडा उंचा रहे हमारा यांसारखी देशभक्तिपर गीते सादर केली. अखेरीस राष्ट्रगीत जन गण मन ने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, रोटरी सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ज्येष्ठ गांधीवादी अब्दुलभाई यांच्या देशभक्तिपर घोषणांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी केले.

सहभागी शाळांचा गौरव

कार्यक्रमात अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, ए. टी. झांबरे विद्यालय, झि. तो. महाजन विद्यालय (धानोरा), श्रीमती शेवंताबाई टोके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय, श्रीराम विद्यालय (मेहरूण), जिजामाता विद्यालय, या. दे. पाटील विद्यालय, बाहेती विद्यालय, जय दुर्गा विद्यालय, शंकुतला जे. विद्यालय, पी. के. गुळवे विद्यालय, जे. जे. पंडित हायस्कूल (लोहारा, ता. पाचोरा) आदी शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

प्रत्येक कृतीतून देशप्रेम दिसले पाहिजे – कर्नल धीरज मिनोत्रा

यावेळी मार्गदर्शन करताना कर्नल धीरज मिनोत्रा यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींमधून देशप्रेम व्यक्त करण्याचे आवाहन केले. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकचा कमी वापर यांसारख्या सवयी अंगीकारून देश अधिक सुंदर आणि सक्षम बनविण्यात प्रत्येकाने योगदान द्यावे, असे ते म्हणाले.

शिस्त, स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे संस्कार आवश्यक – महापौर दीपमाला काळे

महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे महत्त्व ओळखून समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन केले. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे सांगत त्यांनी बालपणी रुजलेले चांगले संस्कारच भविष्यात समाज घडवितात, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणामुळे उपस्थितांना अविस्मरणीय देशभक्तिपर सांगीतिक अनुभव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button