आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन कार्यशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षकांचा सहभाग

नंदुरबार (प्रतिनिधी): नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमधील 261 संगणक प्रशिक्षकांची एकदिवशीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेतून आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शिर्डी येथे नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील संगणक प्रशिक्षकांसाठी आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन या विषयावर एकदिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी संगणकाशी मैत्री करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये संगणक हाताळण्याचे कौशल्य विकसित व्हावे, डिजिटल तंत्रज्ञानाविषयीची भीती दूर व्हावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता यावा,
या उद्देशाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे संचालक संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाशिक विभागातील 472 शाळा व गटसाधन केंद्रांमध्ये संगणक प्रयोगशाळांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संगणक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशिक्षकांना अद्ययावत तांत्रिक ज्ञान, प्रयोगशाळा व्यवस्थापन, शैक्षणिक नियोजन आणि डिजिटल शिक्षण पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटनाप्रसंगी नाशिक विभाग प्रमुख अजित धसाडे, प्रकल्प प्रमुख मनोज सिंह, हिना कोसार, विभागीय एमआयएस समन्वयक पूनम वाघमारे,
नंदुरबार जिल्हा समन्वयक दीपक पाठक आदी उपस्थित होते. यावेळी संगणक शिक्षणाचे महत्त्व, डिजिटल साक्षरता, आयसीटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात तंत्रज्ञानाची भूमिका याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे संगणक प्रशिक्षकांच्या कौशल्य वृद्धीस चालना मिळून शाळांमधील आयसीटी प्रयोगशाळांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




