
जळगाव (प्रतिनिधी): सकाळी अचानक घाम येणे, छातीत तीव्र वेदना आणि खांद्यात दुखणे अशी गंभीर लक्षणे जाणवत असताना एका पत्रकाराने मदतीसाठी फोन केला आणि त्यानंतर सुरू झाली जीव वाचवण्याची धावपळ. योग्य वेळी मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे त्यांचा जीव वाचल्याची घटना शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
महादेव हॉस्पिटलमध्ये आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान ही घटना घडली. सकाळी साडेआठच्या सुमारास पत्रकार निलकंठ वाणी यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती देत संपर्क साधला. वाढता घाम, छातीत वेदना आणि खांद्यातील त्रास पाहता तातडीने रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला.
रुग्णालय प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली. रुग्ण दाखल होताच हृदयरोगतज्ज्ञांनी ईसीजी तपासणी केली. तपासणीत गंभीर हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पुढील अँजिओग्राफीमध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी मोठ्या प्रमाणात ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले.
डॉक्टरांनी वेळ न दवडता अँजिओप्लास्टी करत रक्तपुरवठा सुरळीत केला. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे शासन योजनेअंतर्गत उपचार करण्यात आल्यामुळे आर्थिक अडचणी असूनही कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
या घटनेनंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले. योग्य वेळी रुग्णालयात पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. छातीत वेदना, जास्त घाम येणे आणि खांद्यात दुखणे ही हृदयविकाराची महत्त्वाची लक्षणे असून अशी लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.




