
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळकडून कोळसा घेऊन जाणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या एका डब्यात रविवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. जळगाव रेल्वे पुलाजवळ ही घटना घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
रेल्वे प्रशासनाला धुराचे लोट दिसून आल्यानंतर तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित डब्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे दिसून आले.
प्राथमिक माहितीनुसार, कोळशामध्ये निर्माण झालेली उष्णता किंवा घर्षण यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करत आग नियंत्रणात आणली.
वेळीच कारवाई झाल्यामुळे मोठा अपघात टळला असून या घटनेमुळे काही काळ रेल्वे परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.




