
जळगाव (प्रतिनिधी): महावितरणने ग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या देण्यास सुरुवात केलेली आहे. सर्व प्रकारच्या वीजसेवांची माहिती ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाते. वीजबिल तसेच वीजपुरवठा बंदचा कालावधी व इतर माहिती मिळवण्यासाठी जळगाव परिमंडलातील जवळपास सोळा लाख ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
जळगाव परिमंडलातील सर्व वर्गवारीतील एकूण 17 लाख 24 हजार 508 वीजग्राहकांपैकी 15 लाख 90 हजार 711 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील 13 लाख 47 हजार 590 ग्राहकांपैकी 12 लाख 35 हजार 219 ग्राहकांचा अर्थात 91.66 टक्के ग्राहकांचा तर कृषिपंप वर्गवारीतील 3 लाख 76 हजार 918 ग्राहकांपैकी 3 लाख 55 हजार 492 ग्राहकांचा अर्थात 94.32 टक्के ग्राहकांचा समावेश आहे.
जळगाव मंडलात 10 लाख 37 हजार 550 वीजग्राहकांपैकी 9 लाख 75 हजार 429 ग्राहकांनी, धुळे मंडलात 4 लाख 59 हजार 344 वीजग्राहकांपैकी 4 लाख 22 हजार 174 ग्राहकांनी, तर नंदुरबार मंडलात 2 लाख 27 हजार 614 वीजग्राहकांपैकी 1 लाख 93 हजार 108 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे.
या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, बिल भरल्याचे कन्फर्मेशन यासह विविध सेवांची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येते. परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील 92.24 टक्के ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक बदलायचा आहे, त्यांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचाय, त्यांनी 1912 किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या 24 तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकांवर किंवा https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अॅपवर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.



