
रावेर (प्रतिनिधी) : पुण्यावरून रावेरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला फुलंब्रीजवळ अपघात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे २:४५ वाजता घडली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून इतर २२ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर आगाराची बस (क्र. MH-09-FL-0468) पुण्यावरून रावेरकडे येत होती. फुलंब्रीजवळील हॉटेल साईप्रसादसमोर बस पोहोचली असता, बसच्या पुढे जाणाऱ्या शालेय बसच्या चालकाने अचानक उजवीकडे वळण घेतले. या वेळी अपघात टाळण्याच्या प्रयत्नात एसटी बसचालक सचिन बागूल यांनी बस वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली.
या अपघातात योगेश रघुनाथ जोशी, यशोदाबाई विश्वनाथ कुमावत आणि मोहम्मद मोसिन हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बसमधील इतर २२ प्रवासी सुखरूप बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात बसचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.




