
जळगाव (प्रतिनिधी): देशात सर्वाधिक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसविण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुंबई येथे बुधवारी (दि. 25 फेब्रुवारी) पार पडलेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मुंबईतील सहारा स्टार हॉटेल येथे आयोजित समारंभात 92.7 बिग एफएमच्या वतीने विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या संस्था व व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले.
महावितरणच्या वतीने कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता प्रवीण परदेशी आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण समारंभास मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, अभिनेत्री ईशा देवोल, राज्याचे मंत्री आशिष शेलार तसेच ज्येष्ठ अभिनेते बोमन ईराणी यांची उपस्थिती होती.
राज्यात सुमारे 88.50 लाख स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशात महावितरणची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक वीजबिल, दर तासाचा वीजवापर मोबाईलवर पाहण्याची सुविधा, तसेच वीजवापरावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळत आहे. हे मीटर महावितरणकडून ग्राहकांकडे मोफत बसविण्यात येत आहेत.
स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरासाठी प्रतियुनिट 80 पैशांची टीओडी सवलत देण्यात येत असून, औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीजदरात सवलत मिळत आहे.
दरम्यान, राज्यात 9 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ‘स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरच्या लाभांबाबत राज्यभर जनजागृती करण्यात आली.
फोटोओळ-
स्मार्ट मीटर बसवण्यात देशात अव्वल स्थान पटकावण्याच्या कामगिरीबद्दल महावतिरणला मिळालेला ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्कार मुंबई मनपाच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अभिनेत्री ईशा देवोल यांच्या हस्ते स्वीकारताना कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. प्रवीण परदेशी, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार.



