रोजगारजळगावताज्या बातम्या

जळगाव महापालिकेतर्फे ई-बस सेवेसाठी १२० वाहकांची भरती

२० कोटी २ लाखांची ई-निविदा जाहीर

जळगाव (प्रतिनिधी): शहरात लवकरच सुरू होणाऱ्या पर्यावरणपूरक ई-बस सेवेसाठी जळगाव महानगरपालिका यांच्याकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेल्या दैनंदिन संचलनासाठी १२० वाहक (कंडक्टर) पुरविणाऱ्या संस्थेची नेमणूक करण्यासाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी यासाठी २० कोटी २ लाख १७ हजार ६०० रुपये इतक्या रकमेची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तरुणांसाठी रोजगाराच्या संधी

ई-बस सेवेमुळे जळगाव शहर व परिसरातील प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने वाहक पुरवठ्यासाठी निविदा मागविल्या आहेत. इच्छुक व पात्र पुरवठादारांसाठी अटी व शर्तींसह सविस्तर माहिती २३ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.

प्रकल्पाचे स्वरूप

या ई-बस प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ३० ई-बसेस शहराच्या सेवेत दाखल होणार आहेत. यामध्ये १२ मीटर लांबीच्या २४ मोठ्या बसेस आणि ९ मीटर लांबीच्या ६ मध्यम आकाराच्या बसेसचा समावेश आहे. जळगाव शहरासाठी एकूण ५० ई-बसेस मंजूर करण्यात आल्या असून, पुढील टप्प्यात उर्वरित बसेस कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

पायाभूत सुविधा अंतिम टप्प्यात

ई-बस डेपो, पार्किंग व्यवस्था तसेच चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, हे काम वेगाने सुरू आहे. ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील प्रदूषणात घट होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले असून, निविदा स्वीकारणे अथवा रद्द करण्याचा अंतिम अधिकार त्यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button