ताज्या बातम्याजळगाव

खानापूर शाळा आवारातील जुन्या झाडांची तोड; ग्रामस्थांमध्ये नाराजी

रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील खानापूर येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या अनेक जुन्या व मोठ्या डेरेदार झाडांची परवानगीशिवाय तोड करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी लावण्यात आलेली ही झाडे शाळेच्या पर्यावरणासाठी महत्त्वाची होती. झाडांच्या छायेत विद्यार्थी बसत असत तसेच परिसरातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत होती. मात्र अचानकपणे ही झाडे कापण्यात आल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या प्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती तसेच संबंधित विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. झाडतोड झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून योग्य चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शालेय प्रशासनाकडून घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून चौकशीअंती आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र ठोस कारवाई होईपर्यंत ग्रामस्थांचा रोष कायम असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button