स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथे पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागात आनंददायी शनिवार व मूल्यवर्धन उपक्रम उत्साहात

रावेर (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथील पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी शनिवार व मूल्यवर्धन उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा, दप्तराविना शाळा उपक्रमातून बौद्धिक विकासासोबतच शारीरिक व मानसिक विकास घडावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धन पुस्तकातील विविध विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. यामध्ये वाहतुकीचे नियम, प्राणी-पक्ष्यांची माहिती, माझी जबाबदारी, जंक फूडचे आरोग्यावर होणारे परिणाम, चला परिसर स्वच्छ ठेवूया अशा विषयांचा समावेश होता. तसेच कृतीयुक्त गीते, शैक्षणिक खेळ आणि विविध सर्जनशील उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
हे सर्व सादरीकरण शाळेच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.



