जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमास प्रारंभ अनुभवातून मिळणारे ज्ञान अधिक प्रभावी – डॉ. केतकी पाटील

जळगाव (प्रतिनिधी): मेरा युवा भारत जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत विद्यापीठात युवकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान होत असून युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. केतकी पाटील फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करताना अनुभवातून ज्ञानार्जन करणे नेहमीच अधिक प्रभावी ठरते, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात मुंबई येथील सुमारे ४० युवक सहभागी झाले असून प्रा. सुजानी व प्रा. प्रणाली यांच्या नेतृत्वाखाली ते जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी मंचावर डॉ. केतकी पाटील, जिल्हा युवक अधिकारी अभिषेक चौरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक तसेच विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविकात अभिषेक चौरे यांनी आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले.

यावेळी डॉ. केतकी पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कवयत्री बहिणाबाई चौधरी अशिक्षित असल्या तरी जीवनातील अनुभवांतून त्यांनी अजरामर काव्यनिर्मिती केली. अनुभव घेऊन शिकण्यासाठीच युवक येथे आले असून, या उपक्रमामुळे शहरी व ग्रामीण भागातील वैचारिक व सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी एक प्रभावी पूल निर्माण होईल.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व डॉ. व्ही. एम. रोकडे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. सहभागी युवकांना मान्यवरांच्या हस्ते शूज, ट्रॅकसूट व पाण्याची बाटली असलेली किट वितरित करण्यात आली. तसेच सहभागी युवकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

या उपक्रमांतर्गत हे युवक पालसह जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देणार असून, येथील वातावरण, संस्कृती, खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक स्थळे व ग्रामपंचायती यांची माहिती घेणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button