ताज्या बातम्याजळगावधार्मिक

पिंप्राळ्यात महाकालेश्वर शिवलिंगाची भव्य भस्मआरती

ब्रह्माकुमारीज्‌तर्फे जागृत ज्योतिर्लिंग दर्शन; भाविकांची मोठी उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) : पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूलच्या बाजूला बेंडाळे मैदानावर ब्रह्माकुमारीज्‌तर्फे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग यांच्या जागृत शिवलिंगाच्या प्रेरक प्रतिकृतीची पारंपरिक विधीनुसार भव्य भस्मआरती संपन्न झाली. या धार्मिक सोहळ्यास जळगाव शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

ब्रह्माकुमारीज् यांच्या वतीने भारतातील जागृत ज्योतिर्लिंगांची आध्यात्मिक ऊर्जा जळगावकरांना अनुभवता यावी, या उद्देशाने सुमारे 20 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात भव्य दर्शनस्थळ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी ध्यानकक्ष, प्रवचन कक्ष तसेच बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन उभारण्यात आले असून शिवध्वज संकल्पनेवर आधारित प्रदर्शनी कक्षांमधून शिवतत्त्व, आत्मज्ञान व जीवनमूल्यांचा संदेश दिला जात आहे. जळगाव सबझोनच्या मार्गदर्शनाखाली चित्रे, संदेश व आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून जनतेला अध्यात्मिक अनुभव देण्यात येत आहे.

भस्मआरतीदरम्यान गर्भगृहात विशेष पूजाविधी, अभिषेक व अलंकारानंतर भगवान महाकालेश्वरांना पवित्र भस्म अर्पण करण्यात आले. शास्त्रोक्त मंत्रोच्चार, शंखध्वनी आणि ढोल-ताशांच्या निनादात “हर हर महादेव”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दर्शनासाठी सुरक्षेची व शिस्तबद्ध व्यवस्थेची काटेकोर तयारी करण्यात आली होती.

भस्मआरतीचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना भाविकांनी सांगितले की, या आरतीतून जीवनातील अहंकार, विकार व नकारात्मकता भस्म करून अंतर्मन शुद्ध करण्याचा संदेश मिळतो. आजच्या भस्मआरतीने शिवभक्तीत उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव दिला.

या प्रसंगी विष्णुकांत तापडीया, तुलसी पाईपचे संचालक, डॉ. संभाजी देसाई, अरुण लाहोटी, लाहोटी इंडस्ट्रीजचे संचालक, तसेच **इस्कॉन जळगाव**चे अध्यक्ष पार्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. 17 रोजी सायंकाळी 7 वाजता पुन्हा भस्मआरती होणार असून बुधवार दि. 18 फेब्रुवारीपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button