शैक्षणिकताज्या बातम्यानंदुरबारमहाराष्ट्र

श्रॉफ हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

विद्यार्थ्यांना आपत्तीवेळी बचाव व प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन

नंदुरबार (प्रतिनिधी) : येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आपत्ती व्यवस्थापनावर आधारित प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत तसेच सुरक्षित बचाव पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ग्राम संजीवनी प्रतिष्ठान अहिल्यानगर व शाळेच्या विद्यार्थी सुरक्षा समितीच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा राबविण्यात आली. शाळेच्या प्राचार्या सुषमा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य प्रशांत बागुल, पर्यवेक्षिका सीमा पाटील तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे स्वयंसेवक वरुण पाटील, योगेश पवार, कीर्ती पवार उपस्थित होते.

कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीतील फरक, स्थलांतरण पद्धती, जीवित रक्षण उपाय, आरोग्याशी संबंधित प्रथमोपचार व इतर बचाव तंत्रांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पूर, भूकंप, भूस्खलन व त्सुनामीसारख्या आपत्तींच्या प्रसंगी उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून स्वतःचा व इतरांचा कसा बचाव करावा, याचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

यावेळी फ्लोटिंग डिव्हायसेस, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, फर्स्ट एड किट, पॉकेट लाईन्स तसेच इतर आपत्ती व्यवस्थापन साधनांची ओळख करून देत त्यांचा वापर कसा करावा, हे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. कार्यशाळेचे आयोजन शिक्षक वैभव पाटील, जगदीश वंजारी व हेमचंद्र मराठे यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button