आयोजनजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा प्रशासनातर्फे भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन

18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

उत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवचरित्राचे स्मरण व नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह शेजारील मैदानावर गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा, तर भाऊचे उद्यान, काव्यरत्नावली चौक येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा होणार आहे. निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन दि. 19 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.

दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून शिवाजी पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून विद्यार्थी, एनसीसी विद्यार्थी, शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी शौर्यगाथांवर आधारित पोवाडा कार्यक्रम होणार असून सायंकाळी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचा “शाहिरी शिवदर्शन” हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

शिवजयंती उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button