
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा प्रकार सॅटेलाइट पाहणीदरम्यान उघडकीस आला आहे. तपासात तब्बल ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात नसलेले केळी पीक दाखवून विमा दावे सादर करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, या माध्यमातून सुमारे ३७ कोटी रुपयांची विमा रक्कम गैरमार्गाने मिळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सॅटेलाइट सर्वेक्षणात शेतजमिनीवरील प्रत्यक्ष पीक स्थिती आणि विमा प्रस्तावातील नोंदी यामध्ये मोठी तफावत आढळून आली. अनेक ठिकाणी केळी पीक अस्तित्वात नसतानाही कागदोपत्री पीक दाखवून विमा संरक्षण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगाव जिल्हा प्रशासनाने संबंधित विमा दावे तपासणीखाली घेतले असून, दोषी लाभार्थी, मध्यस्थ तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नियमबाह्य पद्धतीने विमा रक्कम मिळवणाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेचा गैरवापर होत असल्याने प्रशासनाने भविष्यात अधिक काटेकोर तपासणी यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



