के.सी.ई. सोसायटीत केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण व पोस्टर प्रदर्शन

जळगाव (प्रतिनिधी): के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बॉटनिकल गार्डन परिसरात केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ चे विश्लेषण व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे होते.
यावेळी बोलताना डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी विविध अंगांनी केंद्रीय अर्थसंकल्प समजून घेत उत्कृष्ट पद्धतीने पोस्टर सादर केली. हा उपक्रम अतिशय स्तुत्य व मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. देवेंद्र इंगळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मेहनतीने, अचूक आकडेवारीसह अर्थसंकल्पासारखा अवघड विषय सोप्या पद्धतीने मांडला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित होते व अभ्यास अधिक प्रभावी बनतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या उपप्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसुर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अब्दुलकादिर आरसीवाला, आयक्यूएसी समन्वयक डॉ. केतन नारखेडे यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलवरसिंग वसावे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींचे साध्या भाषेत विश्लेषण केले. या उपक्रमात सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून सादरीकरण केले. संरक्षण, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रेल्वे, पर्यटन, विदेशी गुंतवणूक, मेक इन इंडिया तसेच तरुणांसाठी रोजगार संधी या विषयांवरील पोस्टर विशेष लक्षवेधी ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रामप्रसाद बुधवंत, डॉ. नासिकेत सूर्यवंशी, डॉ. गोविंद पवार, डॉ. सविता पाटील, डॉ. भाग्यश्री होले, डॉ. नीलेश चौधरी, डॉ. ज्योती पाटील, डॉ. तुषार चौधरी व प्रा. विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. गोविंद पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नासिकेत सूर्यवंशी यांनी केले.



