जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रविकास

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा – गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी): स्मार्ट वीजमीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर ८० पैसे ते एक रुपया प्रतियुनिट सवलत दिली जात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट मीटर बसवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत रविवारी (१५ फेब्रुवारी) धरणगाव उपविभागातील बोरगाव बु. येथे ३ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर बसवणे हा ग्राहकहिताचा महत्त्वाचा उपक्रम आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक व वेळेवर बिल मिळणार असून, हे मीटर पूर्णतः मोफत आहेत.

स्मार्ट मीटरबाबत समाजात विविध गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र हे मीटर प्री-पेड नसून पोस्टपेडच असून, ऑटोमॅटिक रीडिंगमुळे चुकीचे बिल येण्याचा प्रश्नच राहणार नाही. स्मार्ट मीटरमुळे बिल दुप्पट येते ही अफवा असून, प्रत्यक्षात ग्राहकांच्या बिलात बचत होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी भीती न बाळगता स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास महावितरण धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरगावचे सरपंच भैय्या मराठे यांनी केले.

कॅप्शन : बोरगाव बु. येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button