महाराष्ट्रजळगावताज्या बातम्याधार्मिक

ब्रह्माकुमारीज तर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी): महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने जळगाव शहरात विविध आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ढाके कॉलनी येथील सेवाकेंद्रात शिवध्वजारोहण, औंकारेश्वर मंदिर येथे रुद्राक्षांनी साकारलेल्या शिवलिंगाचे दर्शन तसेच शिवधाम, निमखेडी येथे रत्नजडीत प्रतिकात्मक शिवलिंगाची निर्मिती करण्यात आली.

शिवध्वजारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात

सकाळी ढाके कॉलनीस्थित ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात भक्तिमय वातावरणात शिवध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावच्या महापौर दिपमाला काळे यांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित काळे, दिपक सूर्यवंशी, हेमंत देवपूरा (संचालक, श्रृंगार ज्वेलर्स), व्यावसायिक धीरज सोनी, ब्रह्माकुमार मधुकरभाई व ब्रह्माकुमार शांतारामभाई उपस्थित होते. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी वर्षादीदी यांनी केले.

या प्रसंगी उपस्थितांना शिवप्रतिज्ञा देण्यात आली. “शिवशक्तीच्या मार्गाने चालत पवित्र, सकारात्मक व मूल्यनिष्ठ जीवन जगण्याचा संकल्प” उपस्थितांनी केला.

रुद्राक्ष शिवलिंगाचे दर्शन

औंकारेश्वर मंदिरात रुद्राक्षांनी साकारलेले भव्य शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेत आध्यात्मिक समाधान अनुभवले.

निमखेडी येथे रत्नजडीत शिवलिंग

शिवधाम, निमखेडी येथे आकर्षक रत्नजडीत प्रतिकात्मक शिवलिंगाची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी उपमहापौर मनोज चौधरी यांनी भेट देऊन दर्शन घेतले व उपक्रमाचे कौतुक केले.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या विविध कार्यक्रमांमुळे जळगाव शहरात भक्तिमय व सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वतीने समाजात आध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button