बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘भारतातील सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक-आर्थिक विविधता’ विषयावर व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी): डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथे राज्यशास्त्र व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने “भारतातील सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक-आर्थिक विविधता” या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. हे व्याख्यान कला, वाणिज्य आणि गृहशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. निता पाटील यांनी शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी) धांडे सभागृहात दिले.
प्रा. पाटील यांनी भारतातील विविध संस्कृती, भाषा आणि सामाजिक-आर्थिक रचनेतील विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. भारताची एकता ही विविधतेतूनच अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकात्मता जपत सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विविधतेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना व्यापक दृष्टीकोन विकसित करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख डॉ. दिपक किनगे यांनी केले, तर सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे शांताराम तायडे यांनी केले. कार्यक्रमास हिंदी विभागाचे डॉ. देवेंद्र बोंडे उपस्थित होते. व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.



