
जळगाव (प्रतिनिधी): जागतिक रेडिओ दिनाचे औचित्य साधून स्थानिक महाविद्यालयाच्या वतीने समुदाय रेडिओ मनभावन केंद्राला विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी रेडिओचे कार्य, प्रसारणाची पद्धत आणि बदलत्या तंत्रज्ञानासोबत माध्यमाचा झालेला प्रवास प्रत्यक्ष अनुभवला.
या भेटीसाठी शैक्षणिक संचालिका मृणालिनी फडणवीस, उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता प्रा. बी. एन. केसूर तसेच पाल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सी. पी. लभाणे यांचे मार्गदर्शन लाभले. रेडिओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्टुडिओची कार्यपद्धती, रेकॉर्डिंग प्रक्रिया आणि लाईव्ह ब्रॉडकास्टिंगमधील तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली.
आरजे शुभांगी यांनी रेडिओ सादरीकरणातील आवाजाचा चढ-उतार, प्रभावी संवादकला आणि श्रोत्यांशी नाते निर्माण करण्याच्या तंत्रांवर मार्गदर्शन केले. “रेडिओ हे केवळ माहिती देणारे माध्यम नसून भावना पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुखांची उपस्थिती होती. यामध्ये डॉ. के. पी. नारखेडे (IQAC समन्वयक), डॉ. एल. पी. वाघ, डॉ. दिलवरसिंग वसावे, डॉ. अखिलेश शर्मा, डॉ. नाशिकर सूर्यवंशी, डॉ. मनोज महाजन यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्राध्यापिका अंकिता दुबे आणि विनोद अहिरे यांनी परिश्रम घेतले.
भेटीदरम्यान ‘रेडिओच्या आठवणी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या युगातही रेडिओचे महत्त्व कायम असून ते अधिक व्यापक स्वरूपात पोहोचत असल्याचा सूर चर्चेतून उमटला. प्राध्यापकांनी आपल्या बालपणातील रेडिओ ऐकण्याच्या आठवणी सांगून वातावरणात उत्साह निर्माण केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यम क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत माहिती मिळाली तसेच प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली.



