16 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन येत्या 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. शासकीय यंत्रणेकडून महिलांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन त्यांची सोडवणूक व्हावी आणि समाजातील गरजू महिलांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
महिला लोकशाही दिन हा उपक्रम जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी नियमितपणे राबविण्यात येतो. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील महिला लोकशाही दिन 16 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
तरी सर्व समस्याग्रस्त व गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी दालनात उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे.




