आयोजनजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरसोली प्र. बो. येथे भव्य ‘बारा ज्योतिर्लिंग शिवदर्शन महोत्सव’ उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) : महाशिवरात्री व त्रिमूर्ती शिवजयंतीच्या पावन पर्वानिमित्त ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वतीने दक्षेश्वर महादेव मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेला भव्य बारा ज्योतिर्लिंग शिवदर्शन महोत्सव’ भक्तिभावाच्या वातावरणात व ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उत्साहात पार पडला.

दि. १ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या त्रिदिवसीय महोत्सवाला सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होती. बारा ज्योतिर्लिंगांचे भव्य दर्शन, शिवसंदेश देणारी प्रवचने, भक्तिगीते व महाआरतीमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

महोत्सवाचे उद्घाटन ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्रीय निर्देशिका राजयोगिनी मिनाक्षी दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी त्यांनी शिवतत्त्वाचे आध्यात्मिक रहस्य उलगडत शांत, व्यसनमुक्त व मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमात ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर किर्तनकार महाराज, प्रभाकर शिंपी किर्तनकार महाराज तसेच ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी यांनी भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती विषयक प्रबोधन, शिवसंदेश पदयात्रा तसेच बारी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली जनजागृती ही महोत्सवाची विशेष आकर्षणे ठरली.

या प्रसंगी सरपंच नितीन अर्जुन बूंदे, उपसरपंच दिगंबर रामकृष्ण बारी, पोलिस पाटील श्रीकृष्ण रामदास बारी, समाजसेवक गिरीश वराडे, बँक व्यवस्थापक हेमंत पाटील, बारी स्कूलचे अध्यक्ष निलेश बारी, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाच्या तीन दिवसांत श्रीमद्‌भगवद्गीतेच्या श्लोकांवर आधारित स्वतःची ओळख, परमात्म्याची ओळख व कर्माच्या गूढ गतीवर निरूपण करण्यात आले. नवनाथ संप्रदायातील सागर महाराज यांनी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेत प्रदर्शनाचे अवलोकन केले व परमात्मा ज्ञानाचा लाभ घेत ईश्वरीय सौगात व प्रसाद स्वीकारला. महा मृत्युंजय मंदिरातून आलेल्या साधूंसह वाराणसी (काशी) येथील महाराज जितेश्वर उपाध्याय व त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते.

शिवसंदेश महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्रह्माकुमारीज् परिवार व शिरसोली ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. महोत्सवानंतर राजयोग प्रवचनमाला शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी वर्षा बहन यांनी केले, तर आभार ब्रह्माकुमारी तेजल दीदी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button