‘आर. सी. बाफना ज्वेलर्स’मधील सोन्याची साखळी चोरणारा आंतरराज्यीय आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

जळगाव (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अँड सन्स) मध्ये ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची चैन चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या सोन्याची वितळवून बनवलेली ‘लगड’ (Gold Ingot) हस्तगत केली असून, गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल मिळवण्यात यश आले आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी एका अज्ञात इसमाने ज्वेलर्समध्ये प्रवेश करून, सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत अंदाजे २,४९,६१५/- रुपये) चोरून नेली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०५(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. संशयित आरोपी तेलंगणा राज्यातील सायबरबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यावर, पथकाने तेथे जाऊन भास्कर किसन बानोथ (वय २२ वर्षे, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.
आरोपीने ओळख पटू नये आणि चोरीचा माल खपवता यावा या उद्देशाने चोरलेल्या साखळीला वितळवून सोन्याची लगड बनवली असल्याचे कबूल केले. पोलिसांनी ती लगड हस्तगत केली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला शनिपेठ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.




