ताज्या बातम्याक्रीडाजळगावशालेय

राष्ट्रीय योगासन स्पर्धेला अनुभूती निवासी शाळेत सुरूवात; अतुल जैन यांचे मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : योग हा भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला अमूल्य वारसा आहे. मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी योगाचा सराव अत्यंत उपयुक्त असल्याचे अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले. अनुभूती निवासी स्कूलमध्ये शनिवारी मुलींच्या १७ वर्षाखालील ६९वी नॅशनल स्कूल गेम्स राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

“आरोग्यदायी जीवनासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी योगाभ्यास करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय योगासन स्पर्धा खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देते,” असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी अशोक जैन (जैन इरिगेशन सिस्टीम्स), अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू, व्यवस्थापक अर्णव शॉ, विभागीय स्पोर्ट्स समन्वयक सिद्धार्थ किर्लोस्कर, मुख्य पंच डॉ. आरती पाल, तसेच एसजीएफआयचे मुख्य निरीक्षक रितू पाठक यांच्या उपस्थितीत झाले.

सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगवले उद्घाटन

उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून केली. त्यानंतर अशोक जैन यांनी सीआयएससीई बोर्डाचा ध्वज फडकवला. ध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रीय योग खेळाडू यशश्री नांद्रे हिने स्पर्धेची मशाल घेतली आणि क्रमाने इतर खेळाडूंना सुपर्द केली. अखेरीस चारही खेळाडूंनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेला अधिक थरारक स्वरूप दिले.

विद्यार्थ्यांनी नंतर रिंग जगलिंग, रनपा नृत्य आणि योग नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांचे मन जिंकले. योगासनांच्या कलात्मक सादरीकरणातून शरीर, श्वास आणि साधनेचा अद्वितीय संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.

स्पर्धेसाठी पोषक वातावरण – रितू पाठक

स्पर्धेसाठी अनुभूती निवासी स्कूलचे नैसर्गिक आणि शांत वातावरण खेळाडूंना भावले, असे एसजीएफआयचे मुख्य निरीक्षक रितू पाठक यांनी सांगितले. सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू यांनीही आयोजक स्कूलच्या व्यवस्थेचे कौतुक केले.

देशभरातून १६७ खेळाडूंचा सहभाग

या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत देशभरातून ३३ संघ सहभागी झाले असून १६७ खेळाडू विविध प्रकारात योगासन सादर करतील. स्पर्धेत आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर या चार प्रकारांमध्ये योगासने सादर केली जातील. स्पर्धेच्या सेमी-फायनल व फायनल नंतर विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक देण्यात येणार आहेत.

संपूर्ण भारतातील संघांचा सहभाग

आंध्रप्रदेश, बिहार, सीबीएसई वेल्फेअर स्पोर्ट्स, सीबीएसई, चंदीगड, छत्तीसगड, दादर व नगर हवेली, दमण व दीप, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळा, आयपीएससी स्कूल, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केंद्रीय विद्यालय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, नवोदय विद्यालय, ओडिशा, पुदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, विद्याभारती, पश्चिम बंगाल अशा ३३ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button