जळगाव मनपा निवडणूक; गुरुवारी ५१६ केंद्रावर मतदान, शुक्रवारी दुपारपर्यंत लागणार निकाल!

मनपा प्रशासन सज्ज, निवडणूक साहित्याचे वाटप आजपासून
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, संपूर्ण प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले आहे. येत्या गुरुवारी, १५ जानेवारी २०२६ रोजी शहरातील ५१६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन दुपारी २ वाजेपर्यंत शहराच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, शोभा बाविस्कर आणि सहा निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार
मतदान केंद्रे : शहरात एकूण ५१६ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
कर्मचारी नियुक्ती : एकूण ३,५५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यात २०० महिला कर्मचारी आणि ५२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सुरक्षा व्यवस्था : सुरक्षेच्या दृष्टीने ५१६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रशिक्षण : ७२ मास्टर ट्रेनर्सनी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
मंगळवारपासून एमआयडीसी येथील वखार महामंडळ (क्र. १४ व १७) येथून निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शहराची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.




