जिल्हा परिषदेच्या बोदवड ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील एका कर्मचारी निलंबित!

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.या तपासणीत जिल्हा परिषदेच्या बोदवड ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्यांवर दिव्यांगत्व तपासणी अहवालात आवश्यक त्या निकषांनुसार टक्केवारी आढळून न आल्यानेमुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
बोदवड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात कार्यरत वरिष्ठ सहाय्यक शंकर वाघमारे यांची नियुक्ती दिव्यांग प्रवर्गातून करण्यात आली होती. या अनुषंगाने त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दिव्यांगत्व तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाघमारे यांचे दिव्यांग प्रमाणपत्रावरील नमूद दिव्यांगत्व व तपासणी दरम्यान आढळून आलेल्या दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळून आल्याने या प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.




