
शासन निर्णयामुळे ‘पवित्र पोर्टल’ प्रक्रियेला मिळणार वेग
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टलमार्फत (Pavitra Portal) होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीमधील धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि शासनाला शिफारशी करण्यासाठी एका उच्चस्तरीय ‘सुकाणू समितीचे’ (Steering Committee) गठन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
उमेदवारांना दिलासा मिळणार
गेल्या काही काळापासून पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेत विविध तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे विलंब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आता या विशेष सुकाणू समितीच्या माध्यमातून निर्णयांची प्रक्रिया जलद होणार असल्याने, शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या समितीच्या माध्यमातून पारदर्शक आणि वेगवान पदभरती करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे.
शासन निर्णय – “पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरुप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेणेबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे सुकाणू समितीचे गठन करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.”
सुकाणू समितीची रचना पुढीलप्रमाणे
• अध्यक्ष – आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
• सदस्य – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, पुणे, शिक्षण संचालक, (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे
• सदस्य सचिव – आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चचाणी सन २०२५ नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपविण्यात येत असून, उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे.
पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप व त्यानुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक 202512301131162221 असा आहे. हा आदेश आबासाहेब कळवे (उपसचिव, महाराष्ट्र शासन) यांच्या डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.




