जळगावताज्या बातम्यानिवडणूकराजकारण

भाजपचा जळगावात मोठा निर्णय; जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची पक्षातून ‘हकालपट्टी’!

जळगाव (प्रतिनिधी) : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्त मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. पक्षशिस्त आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अक्षय चत्रभुज सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि संघटनात्मक शिस्त कायम राहावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपच्या अधिकृत धोरणांना हरताळ फासणे आणि पक्षविरोधी कारवाया करणे, यामुळे पक्षाच्या प्रतिमेला बाधा निर्माण होत असल्याचे निष्पन्न झाले.

याचाच परिणाम म्हणून, भाजपच्या कोअर कमिटीने संबंधित पदाधिकाऱ्यांचे प्राथमिक सदस्यत्व आणि त्यांच्याकडे असलेली सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षहितासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हकालपट्टी करण्यात आलेले पदाधिकारी:

  1. अक्षय चत्रभुज सोनवणे (जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष)
  2. किशोर (श्रीकृष्ण) गोविंदा वाघ
  3. देवयानी सुभाष चौधरी

या निर्णयामुळे जळगाव भाजपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक काळात बंडखोरी किंवा शिस्तभंग करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच या कारवाईतून पक्षाने दिला आहे. हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला असून, यापुढे संबंधित व्यक्तींचा पक्षाशी कोणताही संबंध नसेल, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button