क्राईमजळगावताज्या बातम्याशासकीय

आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा म्होरक्या पुण्यातून जेरबंद!

२ मोठे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आंतरराज्यीय गुन्हेगार चंदन राजू जुनी (रा. उल्हासनगर) याला पुण्यातील हडपसर भागातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दोन मोठ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण करत संशयित आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार चंदन राजू जुनी (वय ४५, रा. सरदारपाडा वस्ती, उल्हासनगर-१, ता. कल्याण, जि. ठाणे) याला पुण्यातील हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. हे गुन्हे त्याने त्याचा भाऊ कुलदीप राजू जुनी आणि आणखी दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचेही स्पष्ट झाले.

चोरी केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट कुलदीप जुनी याने लावून त्यातील ३८ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने चंदनच्या बँक खात्यावर पाठविल्याची माहितीही चौकशीत उघड झाली आहे. अटक करण्यात आलेल्या चंदन जुनीला पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. तांत्रिक व नेत्रम विभागाच्या सहकार्याने गुन्हे उघडकीस येण्यास मोठी मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button