
अपक्ष उमेदवार कांचन सोनवणे यांचा प्रतीक्षा सोनवणे यांना बिनशर्त पाठिंबा
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रभागातील भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रतीक्षा कैलास सोनवणे यांना अपक्ष उमेदवार कांचन विकास सोनवणे यांनी आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंबा दिल्यामुळे कांचन सोनवणे यांचे पक्षाकडून केलेले हकालपट्टी रद्द होणार आहे.
या संदर्भातील पाठिंब्याचे पत्र कांचन सोनवणे यांनी भाजप कार्यालयात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या उपस्थितीत सुपूर्द केले. या निर्णयामुळे प्रतीक्षा सोनवणे यांची स्थिती अधिक भक्कम झाली असून महायुतीचा विजय सुकर झाल्याचे मानले जात आहे. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष धनराज विसपुते, माजी महापौर भारतीताई सोनवणे, माजी नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतीक्षा सोनवणे यांनी या पाठिंब्याबद्दल कांचन सोनवणे यांचे आभार मानले असून, विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक बहुमताने जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या या घडामोडीमुळे प्रभाग ३ मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




