
तरुणावर जीवघेणा हल्ला करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) : शहराचे मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट परिसरात आज, ३१ डिसेंबर रोजी दुपारी एका तरुणावर जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमीला रिक्षाने रुग्णालयात दाखल केले असून संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
साई बोराडे (१८, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे जखमी तरुणावर नाव आहे. देवकर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेला साई बोराडे व संशयित शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट,जळगाव) दोघांत जुने वाद होते. सकाळी शुभम आणि साई यांचे एकमेकांशी वाद झाले.
दरम्यान, दुपारी साई बोराडे हा गोलाणी मार्केट जवळ असताना, संशयित शुभम याने चाकूने साई बोराडेवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या साईला नागरिकांनी तातडीने एका रिक्षामध्ये टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील हल्लेखोर शुभम सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.




