जळगाव मनपा निवडणूक : उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी

जळगाव महापालिकेसाठी दोन दिवसात ‘इतके’ उमेदवारी अर्ज…!
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असून आज सकाळी उमेदवारी अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. दिवसभरात राजकीय पक्षांचे दिग्गज आणि अपक्ष उमेदवारांनी मनपाच्या प्रशासकीय इमारतीत अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दि. २३ डिसेंबरपासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत मनपात अर्जांचे वितरण आणि स्वीकृती केली जात आहे. केवळ याच वेळेत निवडणूक विषयक कामकाज सुरू असल्याने या काळात महापालिका परिसरात मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाने कामात सुसूत्रता आणण्यासाठी विशेष खिडक्यांची व्यवस्था केली आहे. होणारी गर्दी आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी जळगाव शहर पोलिसांनी मनपा आवारात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण गर्दी करणाऱ्यांना इमारतीबाहेरच रोखले जात असून, केवळ इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जात आहे.
दोन दिवसात 1395 अर्जांची विक्री
मनपात गेल्या दोन दिवसापासून तब्बल १३९५ अर्ज विक्री करण्यात आली आहे. आज दि. २४ रोजी दिवसभरात एकूण 618 अर्जांची विक्री झाली असून एकही इच्छुक उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. तसेच काल ७७७ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. गुरुवारी सुट्टी असल्यामुळे लवकर आज अर्ज खरेदी करण्यासाठी मनपा उमेदवारांची तोबा गर्दी पाहायला मिळाली.




