जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराजकारण

प्रतीक्षा संपली; जळगाव जिल्ह्यातील 18 पालिकांचा आज निकाल!

सकाळपासूनच कारकर्त्यांमध्ये उत्सुकता; जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर व काही प्रभागासाठी दि. 20 रोजी मतदान झाले. या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ६५.५८ टक्के मतदान झाले असून आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. आज रविवार, दि. २१ डिसेंबर सर्वच पालिकांचा निकाल लागणार आहे. सकाळपासूनच सर्वच पक्षातील कारकर्त्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत असून जिल्हा प्रशासनही निकालासाठी सज्ज आहे.

आज सकाळी ठीक १० वाजता निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत संपूर्ण निकाल प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्ह्यातील एकूण ८ लाख ८१ हजार ५०८ मतदारांपैकी ५ लाख ७८ हजार ०६९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १८ नगराध्यक्ष आणि ४६४ सदस्य याचा फैसला आज होणार आहे.

एरंडोलमध्ये सर्वाधिक मतदान
प्राप्त आकडेवारीनुसार, एरंडोल नगरपरिषदेत जिल्ह्यात सर्वाधिक ७५.४९ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल रावेर (७४.७४ टक्के) आणि यावल (७३.१६ टक्के) यांचा क्रमांक लागतो आहे. दुसरीकडे, सर्वात मोठी नगरपरिषद असलेल्या भुसावळमध्ये सर्वात कमी म्हणजे ५५ टक्के इतकेच मतदान झाले आहे.

मतमोजणीसाठी १६० पथके सज्ज
प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून जिल्ह्यात एकूण १६० पथके नेमण्यात आली आहेत. मतमोजणीची प्रक्रिया एकूण ११६ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. यामध्ये भुसावळमध्ये सर्वाधिक १५ फेऱ्या, तर धरणगाव आणि रावेरमध्ये सर्वात कमी २ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.

नशिराबाद नगरपरिषदकडे जिल्ह्याचे लक्ष
दरम्यान, नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत ८४ नगरसेवक पदांसह ६ नगराध्यक्ष उमेदवारांचे भवितव्य ठरणार असल्याने, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी ४ फेऱ्या, ९ टेबल्स लावण्यात आले असून, या प्रक्रियेला पार पाडण्यासाठी टेबलवर ३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच माध्यमांसाठी स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात येणार असून निकाल क्षणाक्षणाला प्रसिद्ध केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button