
जळगाव जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांतील ९ प्रभागांसाठी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद |
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमधील नऊ प्रभागांसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे सुरु असून यावल नगरपरिषदेत सर्वाधिक ६७.३६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला असून, सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत लोकशाहीचा हक्क बजावला आहे.
सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद असला तरी दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढताना दिसून आली. प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक यंत्रणेकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.
असे झाले मतदान
दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्हाभरात सरासरी ४६.५३ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.यात वरणगाव नगरपरिषदेत ४९.६९ टक्के, पाचोरा येथे ४६.९९ टक्के, भुसावळ येथे तुलनेने कमी म्हणजेच ३२.८४ टक्के मतदान झाले आहे. अमळनेर नगरपरिषदेत ४६.५० टक्के, सावदा येथे ५७.५६ टक्के तर यावल नगरपरिषदेत सर्वाधिक ६७.३६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.




