केंद्रीय विद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतील केंद्रीय विद्यालात राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह (National Library Week) अत्यंत उत्साहात आणि अभिनव उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचनाशी जोडणे आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश होता.
दि. १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान आयोजित या सप्ताहात विद्यालयातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आयोजित वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ‘पुस्तक पितृत्व’ (Pustak Pitra) एक अनोखा उपक्रम होता. ज्यात विद्यार्थ्यांनी एका पुस्तकाची निवड करून ते ‘दत्तक’ घेतले. त्यांनी त्या पुस्तकाची काळजी घेतली, ते वाचले आणि इतरांना वाचण्यासाठी प्रेरित केले. ‘ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड’ (Drop Everything and Read) उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके नव्हे, तर वर्तमानपत्रे, मासिके, कथासंग्रह आणि विविध साहित्य वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. ‘बुकमार्क’ (Bookmark) निर्मिती या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीने आकर्षक आणि कलात्मक ‘बुकमार्क’ (पुस्तक खुणा) तयार केले. या स्पर्धेमुळे त्यांच्यातील कलात्मकतेला चालना मिळाली.
‘कथाकथन’ (Story Telling): प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेतून, हावभावांसह गोष्टी सादर केल्या, ज्याला सर्वांनी दाद दिली. ‘मुखपृष्ठ डिझायनिंग’ (Cover Page Designing) नव उपक्रमात माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आवडत्या पुस्तकाचे किंवा कल्पित पुस्तकाचे मुखपृष्ठ डिझाइन करण्याची स्पर्धा घेतली गेली. यात विद्यार्थ्यांनी संगणकीय कौशल्ये आणि कलात्मक दृष्टीकोन वापरला. केंद्रीय विद्यालयात साजरा झालेला राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
केवळ पारंपरिक नव्हे तर वाचनापलीकडे जाऊन राबवण्यात आलेल्या ‘पुस्तक पितृत्व’ आणि इतर अभिनव उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ग्रंथालय हे खरोखरच ज्ञानाचे एक आनंददायी केंद्र आहे, हे सिद्ध झाले. संपूर्ण सप्ताह विद्यालयातील ग्रंथालय प्रमुख विद्या हिवराळे यांनी राबविला. प्राचार्य सोना कुमार यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.




