जामनेर तालुक्यात युवकाचा मृत्यू; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

दलित-मुस्लिम-आदिवासी संघटनांचे फैजपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
फैजपूर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट रोजी झालेल्या घटनेत पोलिस भरतीसाठी तयारी करणारा सुलैमान खान पठाण (वय २१) या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबास न्याय मिळावा, यासाठी दलित,मुस्लिम, आदिवासी संघटनांतर्फे , रावेर-यावल तालुका तर्फे फैजपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
११ ऑगस्ट रोजी जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे सुलैमान खान पठाण याला काही समाजकंटकांनी मारहाण केली. पोलिस भरतीची तयारी करणारा हा युवक गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेला धक्का बसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावातील काही व्यक्तींनी तरुणावर हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे.
निवेदनावर प्रमुख व्यक्तींच्या सही
या निवेदनावर शेख कुर्राण शेख करीम (अध्यक्ष, कौमी एकता फाउंडेशन), शामिमा पाटील (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, जळगाव), मुबारक अली तडवी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहया केल्या आहे.
प्रमुख मागण्या अशा
या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. आरोपींना १० दिवसांच्या आत अटक करून न्यायालयात चार्जशीट दाखल करावी. पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत व एकाला शासकीय नोकरी द्यावी. मानवी हक्क आयोगाकडून स्वतंत्र चौकशी व्हावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवावा. जिल्ह्यात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सोशल मीडियावरून भडकावू पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
समाजात असंतोष
या घटनेने परिसरातील अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वेळेत कारवाई न झाल्यास सामाजिक सलोखा धोक्यात येईल आणि भविष्यात अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
बेटावद ता.जामनेर जि.जळगांव येथील सुलेमान पठान या युवकाच्या निर्घृण मॉब लिंचिंग विरोधात आज सकल एकता मंच तर्फे उपविभागीय अधिकारी फैजपुर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी शेख कुर्बान नगरसेवक, शामीभा ताई कलीम मन्यार नगरसेवक, रशीद तडवी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख, फारुक शेख, कौसर अली, जाहीर भाई यावल, अलीम भाई शकील दादा,अख्तर पहेलवान,इरफान खान, वसीम तडवी वाजिद खाटिक, जफर अली, तसेच तडवी टायगर ग्रुप फैजपूर चे पदाधिकारी आणि अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.




