क्राईमजळगावताज्या बातम्याशासकीय

निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर शहरात ‘कोंबिंग ऑपरेशन’!

पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे मोठी खळबळ, ९६ संशयित ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मनपा निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, ३ जानेवारी रोजी पहाटे शहरात अचानक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे मोठी खळबळ उडाली असून या कारवाईत एकूण ९६ संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह शनीपेठ, जळगाव शहर, रामानंदनगर आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. शहराच्या विविध भागांत राबवलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या इसमांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून सर्वाधिक ४१, शनीपेठमधून २१, शहर पोलीस स्टेशनमधून १८ आणि रामानंदनगरमधून १६ जणांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या ९६ जणांपैकी १८ आरोपी हे न्यायालयीन समन्स आणि बेलेबल वॉरंट निघूनही न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यांच्यावर विविध न्यायालयांकडून ‘नॉन बेलेबल वॉरंट’ (NBW) जारी करण्यात आले होते. पोलिसांनी या मोहिमेदरम्यान या १८ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. उर्वरित ७८ जणांना निवडणुकीच्या काळात शांतता राखण्याची कडक समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button