जळगावच्या युथ आयकॉनने सांगितला… ज्ञानसंकल्पमध्ये आपला संघर्षशील प्रवास

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातीलच स्थानिक चार युथ आयकॉन ठरलेल्या तरुणाईने आपला संघर्षशील यशस्वी प्रवास विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला. त्यांनी जिद्द, सातत्य, शिस्त, कठोर परिश्रम या पाठबळावर आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीत आपण यश मिळवू शकतो असा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ज्ञानसंकल्प इंटरॅक्ट डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे ! जैन हिल्सच्या आकाश सभागृहात डॉ. किशन काबरा मंचावर हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला.
त्याचे सूत्रसंचालन रोटरीचे संवाद सचिव व करिअर कौन्सिलर पंकज व्यवहारे यांनी केले. यात यावल तालुक्यातील किनगाव येथील विजय पाटील यांची कन्या व राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियन दिशा पाटील हिने बॉक्सिंग खेळासाठी मिळालेली प्रेरणा व त्यासाठी सकाळी साडेतीन वाजेला उठून केलेला क्षमता वाढविण्यासाठी धावण्याचा कठोर सराव याविषयी माहिती सांगितली. आपल्या यशानंतर पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख मोलाचा असतो असेही तिने सांगितले.
जळगावातील अपूर्वा व सचिन नारळे यांचे पुत्र असलेले व आय.एफ.पी. अवॉर्ड विजेते, गीतकार व कवी शौनक नारळे याने काशिनाथ पलोड स्कूल व एम जे कॉलेजमध्ये झालेली जडणघडण तेथून पुण्यात वेगळ्या क्षेत्रात केलेला प्रवास सांगितला. आयएफपी या स्पर्धेत जगभरातील हजारो स्पर्धकांमधून केवळ ९० जणांची आणि त्यातून ३२ जणांची निवड केली जाते. केवळ ५० तासांमध्ये नवीन स्वरचित गाणे तयार करून त्याला चाल लावून संगीतबद्ध करून नामवंत परीक्षकांसमोर सादर करायचे असते. या स्पर्धेत मिळवलेले प्रथम क्रमांकाचे विजेतेपद आणि श्यामची आई या चित्रपटाच्या गीतासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्काराविषयी त्यांनी अनुभव कथन केले. गीतकार जावेद अख्तर यांची भेट आणि प्रत्येक गाणं हे गीतकारासाठी त्याला आपलं मुलच वाटतं असे सांगून विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात सरावाने परिश्रमाने वाटचाल करावी असा संदेश दिला.
शुभांगी व राजेश यावलकर यांचे पुत्र व माध्यम क्षेत्रात ठसा उमटविलेले पुष्कर यावलकर यांनी परिवाराचा ७० वर्षांचा वृत्तपत्र क्षेत्रातील वारसा पुढे चालवीत माध्यम क्षेत्र व्यापक असल्यामुळे मार्केटिंग, ब्रॅण्डिंग, ऍडव्हर्टायझिंग या क्षेत्राबरोबर स्टार्ट-अप आणि चित्रपट निर्मिती पर्यंत केलेली वाटचाल विद्यार्थ्यांशी शेअर केली. नीलम व अनिल जोशी यांची कन्या असलेली व सॉफ्टबॉल खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सई जोशी हिने ब. गो. शानबागशाळेपासून व एम.जे. कॉलेजमध्ये बारावी सायन्सला असताना आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची मिळालेली संधी याविषयी भावना व्यक्त केल्या.
आजपर्यंत तीन वेळा चीन, तैवान, दक्षिण कोरिया या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याविषयी देखील तिने माहिती दिली. त्याआधी प्रथम सत्रात नो हाऊ या विषयावर इंटरॅक्टचा इतिहास व महत्त्व याविषयी डॉ. तुषार फिरके यांनी तर खाण्याआधी विचार करा या विषयावर डॉ. आश्विन झाला यांनी मार्गदर्शन केले. सायबर सेक्युरिटी या विषयावर ॲड. चैतन्य भंडारी यांनी संवाद साधला. या सत्राचे संचालन स्वाती ढाके यांनी केले. पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक मुजफ्फर सय्यद यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व सुरक्षा तसेच पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची माहिती दिली.




