आरोग्यजळगावताज्या बातम्याशासकीयसामाजिक

बेवारस मतिमंद रुग्णावर यशस्वी औषधोपचार : पुनर्वसनासाठी ठाण्याला केले रवाना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाला यश

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका बेवारस मतिमंद रुग्णावर यशस्वी औषधोपचार करून त्याला पूर्ण बरे करून ठाणे येथील पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले आहे. गेली ३ महिने रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग मायेने काळजी घेत होता. याबाबत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पथकाचे कौतुक केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेतून एका १५ वर्षीय मुलाला मतिमंद असल्याने व त्याला फिटचा आजार असल्याने उपचारासाठी मनोविकार विभागात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी तत्कालीन विभागप्रमुख डॉ. यश महाजन यांनी तपासून त्याला रुग्णालयात दाखल केले. कक्ष क्रमांक १३ येथे गेली साडेतीन महिने मनोविकार विभाग औषधोपचार करून त्याच्या प्रकृतीवर निगराणी ठेवत होता.

त्याचे नातेवाईक मिळून येत नसल्याने या बालकाला मोफत जेवण, मोफत कपडे आणि इतर शुश्रूषा कक्षातील परिचारिका वर्ग, कक्षसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते इसाक बागवान हेच करीत होते. दरम्यान, पूर्ण साडेतीन महिने संपूर्ण उपचार झाल्यावर त्याला विभागप्रमुख डॉ. विकास गायसमुद्रे यांनी तपासून ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात पुनर्वसनासाठी पोलिसांच्या मदतीने रवाना केले.

सदर रुग्णावर यशस्वी उपचार करण्याकामी डॉ. विकास गायसमुद्रे, डॉ. शताक्षी वाघजाळे, डॉ. राहुल पाटील यांच्यासह कक्ष १३ चे इन्चार्ज परिचारिका ज्योती ओतारी, पोलीस कर्मचारी पोकॉ प्रशांत सैंदाणे, अमित मराठे, सामाजिक कार्यकर्ते इसाक बागवान यांच्यासह कक्षसेवकांनी परिश्रम घेतले. त्यांना अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button