
प्रभाग क्रमांक ९ मधून प्रतिमा देशमुख बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेनं हॅट्रिक मारली असून प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून प्रतिभा गजाजन देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. प्रतिमा देशमुख या दुसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत.
आज प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ.गौरव सोनवणे तर प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. यांनतर आता प्रभाग 9 ‘ब’मध्ये प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
त्यांच्या समोर माजी नगरसेविका प्रतिभा पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने देशमुख यांचा विजय निर्विवाद ठरला. प्रतिमा देशमुख या दुसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रभागातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ मिळाले असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




