
नेतृत्व आणि संशोधन कार्यशाळेचा शानदार प्रारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित ‘महिला नेतृत्व’ या विषयावरील विशेष कार्यशाळेचा १९ जानेवारी रोजी उत्साहात प्रारंभ झाला. महिलांचे शैक्षणिक स्तरावरील नेतृत्व गुण विकसित करणे आणि त्यांना प्रशासकीय कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेत संस्थेच्या विविध विभागांतील एकूण ३५ महिला प्राध्यापिकांनी सहभाग नोंदवला. संपूर्ण दिवसाच्या नियोजनात एकूण तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही सत्रांमध्ये ‘शैक्षणिक स्तरावर महिलांचे नेतृत्व कसे वाढवावे’, यावर कृतिशील प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेचे बौद्धिक सत्र अत्यंत प्रभावी ठरले. डॉ. मृणालिनी फडणवीस (केसी ई सोसायटी, शैक्षणिक संचालक ) यांनी दोन सत्रांमध्ये प्राध्यापिकांना नेतृत्वाच्या बारकाव्यांबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. विजेता सिंग यांनी एक सत्र घेऊन शैक्षणिक प्रशासनातील आव्हाने आणि संधी यावर प्रकाश टाकला.या प्रशिक्षणास ‘रोल मॉडेल’ (आदर्श व्यक्तिमत्व) म्हणून खासदार स्मिताताई वाघ यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या व्याख्यानातून त्यांनी महिलांनी जिद्दीने आणि आत्मविश्वासाने नेतृत्वाची धुरा कशी सांभाळावी, याचे सूत्रबद्ध मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ज्योती भोळे यांनी खासदार स्मिताताई वाघ यांची ओळख करून दिली. संपूर्ण दिवसाच्या कार्यशाळेचे नेटके नियोजन आणि नियंत्रण प्रा. भावना मानेकर यांनी यशस्वीपणे सांभाळले.




