
जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक ‘लखपती दीदी’; उपक्रमात उल्लेखनीय यश
जळगाव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक महिलांनी वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत ‘लखपती दीदी’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिला व स्वयं सहाय्यता बचत गटांतील सदस्यांना स्वावलंबी बनविणे हा आहे. त्यासाठी त्यांना विविध लघुउद्योग, गृहउद्योग तसेच उत्पादनाधारित व्यवसायांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य दिले जात आहे. त्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये जिल्ह्यास १ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात १,०६,०७८ महिलांनी हे लक्ष्य ओलांडत यश मिळविले. या कालावधीत सुमारे ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. पुढील वित्तीय वर्ष २०२५-२६ साठी १,११,००० महिलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ते पूर्ण करण्यात आले आहे. या वर्षातही अंदाजे ७५० कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता देण्यात आली असून त्याचे वितरण सुरू आहे.
या योजनेअंतर्गत महिलांकडून पारंपरिक वस्तूंसह नवीन व मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होत आहे. या उत्पादनांना राज्याबाहेर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही मागणी वाढत असल्याने महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्वयं सहाय्यता गटांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे महिलांना व्यवसाय उभारणीस मदत मिळून त्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला चालना मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.




