शासकीयताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्य

‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची यशोगाथा देशासमोर ठेवली; देशातील पहिले स्वयंचलित ई-ऑर्डर मॉड्यूल कार्यान्वित

जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय मनुष्यबळ व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्राने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून, ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची आणखी एक यशोगाथा देशासमोर ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्य शासनाच्या ‘महा ई-एचआरएमएस’, ‘महा-आयएएस’ आणि ‘मेंटॉर-मेंटी पोर्टल’ या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘जिज्ञासा’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित ई-ऑर्डर मॉड्यूल कार्यान्वित करण्यात आले.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कागदाधारित प्रशासनाला डिजिटल पर्याय

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय सेवेत अधिकारी आणि कर्मचारी शासन निर्णय, नियम व पारंपरिक प्रशासकीय प्रक्रियेत अडकून न राहता अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील, यासाठी प्रशासकीय प्रक्रियेची पुनर्रचना आवश्यक आहे. शतकाहून अधिक काळ प्रचलित असलेल्या कागदाधारित प्रशासकीय कार्यपद्धतीचे आधुनिकीकरण करून ती अधिक सुलभ, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने ‘महा ई-एचआरएमएस’ हा महत्त्वाचा टप्पा आहे.

शासकीय सेवेत पदोन्नती ही कर्मचाऱ्यांसाठी मोठी प्रेरणा असते. या प्रणालीमुळे पदोन्नतीची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून, नियुक्ती आदेशापासून निवृत्तीपर्यंतच्या सेवेशी संबंधित विविध बाबी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचा अनुभव असल्याने राज्यासमोरील विविध आव्हाने आणि समस्या सोडविताना त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग होतो. या प्रणालीच्या विकासात सामान्य प्रशासन विभागाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागाचे अभिनंदन केले.

‘महा ई-एचआरएमएस’ हे क्रांतिकारी पाऊल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, आजचा दिवस राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणालीची अंमलबजावणी हा क्रांतिकारी टप्पा असून, यामुळे सेवा विषयक बाबींमध्ये अधिक गतिमानता आणि पारदर्शकता येईल.

शासनाच्या कोणत्याही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही सक्षम प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून असते. ही प्रणाली प्रशासकीय यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासोबतच डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी अधिक मजबूत करेल, असे त्यांनी सांगितले.

ही प्रणाली विकसित करताना सहा डिजिटल साधनांचे एकत्रीकरण करण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात आयएएस संवर्गाचा समावेश

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाचा प्रवास सांगितला. पहिल्या टप्प्यात राज्यातील आयएएस संवर्गाचा समावेश करण्यात आला असून, पुढील टप्प्यात राज्य शासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या प्रणालीत समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या ४२ विभागांमधील १२३ आस्थापनांमध्ये प्रचलित असलेले विविध नियम आणि कार्यपद्धती या प्रणालीमध्ये एकत्रित करण्यात आल्या आहेत.

१९३५ पासूनच्या सेवापुस्तकाला डिजिटल पर्याय

‘महा ई-एचआरएमएस’मुळे १९३५ पासून प्रचलित असलेल्या भौतिक सेवापुस्तकाऐवजी सुरक्षित डिजिटल ई-सेवापुस्तक उपलब्ध होणार आहे. ई-ऑर्डर मॉड्यूलमधून जारी होणाऱ्या प्रत्येक आदेशाच्या आधारे संबंधित सेवा नोंद स्वयंचलितपणे अद्ययावत होणार आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा विषयक आदेशांची माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे मिळणार असून, संपूर्ण सेवाकालातील नोंदी सातत्याने अद्ययावत राहणार आहेत.

‘जिज्ञासा’ देणार कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मार्गदर्शन

‘जिज्ञासा’ हा स्वदेशी आणि सार्वभौम स्वरूपाचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्मार्ट सहाय्यक आहे. आयएएस तसेच एआयएस सेवांशी संबंधित नियमांच्या आधारे त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

या माध्यमातून अधिकाऱ्यांना सेवा नोंदी, लागू सेवा नियम, अनुज्ञेय हक्क आणि अन्य सेवा विषयक बाबींविषयी माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.

‘मेंटॉर-मेंटी’ पोर्टलमुळे अनुभवाची देवाणघेवाण

‘मेंटॉर-मेंटी’ पोर्टलच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा क्षेत्रीय कामकाजाचा अनुभव, प्रशासकीय कौशल्ये आणि संस्थात्मक ज्ञान कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

यामुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अनुभवाची देवाणघेवाण होऊन प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

मोबाईल ॲपमधूनही सेवा सुविधा

‘ई-एचआरएमएस’च्या मोबाईल ॲपद्वारे अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही ठिकाणाहून वेतन पावती पाहणे, उपस्थिती तपासणे आणि रजेचा अर्ज सादर करणे यासारख्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण

राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (NIC) महाराष्ट्र राज्य घटकाने हे सुरक्षित, ओपन-सोर्स आधारित आणि एकात्मिक डिजिटल मानव संसाधन व्यासपीठ विकसित केले आहे. ‘परिचय’ आणि ‘नॅपिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, ई-ऑफिस, आयगॉट कर्मयोगी, महापार, सेवाथ, एनपीएस, डिजिलॉकर, भाषिणी, ई-कॅबिनेट यांसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध डिजिटल प्लॅटफॉर्मशी त्याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही या प्लॅटफॉर्ममध्ये समावेश करण्यात आला आहे. ‘जिज्ञासा’, ‘महा-एआय’ आणि ‘अनुभव एआय’ यांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी स्मार्ट डिजिटल सहाय्य उपलब्ध होणार आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांमध्ये ‘महा ई-एचआरएमएस’ हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button