
पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर वाढत्या अपघातांवर संताप; NHAI चे विशेष पथक पाठवून रोड सेफ्टी ऑडिटची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर शहरातून वळविण्यात आलेल्या अवजड वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, पाच नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २४ ऑगस्ट रोजीच या गंभीर परिस्थितीबाबत निवेदन देऊन आणखी बळी जाण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काही तासांतच आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यालयाला पुरवणी निवेदन देण्यात आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचे विशेष पथक तातडीने जळगाव येथे पाठवून महामार्गाचे स्वतंत्र Road Safety Audit करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘पाचव्या बळीची वाट पाहू नका’चा इशारा ठरला खरा
२४ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या निवेदनात शहरातील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करून, ‘चार बळी गेल्यानंतर आता पाचव्या बळीची वाट पाहू नका’, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही तासांतच आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याने मृतांचा आकडा पाचवर पोहोचला.
या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पाच मृत्यू म्हणजे केवळ आकडे नसून पाच कुटुंबांनी आपली माणसे गमावली आहेत, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर शहरातील महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत खड्डे, असमतोल साईडपट्ट्या, धोकादायक ठिकाणे, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महामार्गावर चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स, स्पीड लिमिट बोर्ड, रम्बल स्ट्रिप्स आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
NHAI चे विशेष पथक पाठविण्याची मागणी
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची तातडीने पाहणी करण्यासाठी NHAI च्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचे विशेष पथक पाठवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पथकाने अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय महामार्गावरील खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या, धोकादायक उंचवटे आणि इतर त्रुटींची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२४ तास रोड सेफ्टी पथक तैनात करण्याची मागणी
पाळधी–तरसोद बायपास पूर्ण क्षमतेने सुरक्षितपणे सुरू होईपर्यंत शहरातील महामार्गावर २४ तास रोड सेफ्टी व आपत्कालीन देखभाल पथक तैनात करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
बायपास बंद करण्याच्या निर्णयाचीही चौकशी करा
पाळधी–तरसोद बायपासवरील पुलाचा भराव खचणे तसेच बायपास बंद केल्यानंतर पर्यायी मार्गावर पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या का, याची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात दोष निश्चित करून जबाबदारी ठरवावी, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
‘आता सहाव्या बळीची वाट पाहणार आहात का?’
निवेदनाच्या शेवटी प्रशासनाला सवाल करण्यात आला आहे की, ‘काल मी लिहिले होते—पाचव्या बळीची वाट पाहू नका. दुर्दैवाने आज पाचवा बळीही गेला. आता सहाव्या बळीची वाट पाहणार आहात का?’
नागरिकांचा जीव कोणत्याही प्रशासकीय विलंबापेक्षा महत्त्वाचा असल्याचे सांगत ४८ तासांच्या आत प्रत्यक्ष उपाययोजना सुरू करून त्याचा लेखी अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. यापुढे आणखी जीवितहानी झाल्यास केंद्र शासन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि संबंधित सक्षम यंत्रणांकडे सर्व पत्रव्यवहारासह दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
‘पाच बळी पुरे झाले; आता आणखी एकही बळी नको!’
पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर निर्माण झालेल्या वाहतूक परिस्थितीवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून जळगावकरांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.




