जळगावताज्या बातम्यासामाजिक

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन राहते : कवी किरण येले

बहिणाई स्मृती संग्रहालयात ‘बहिणाईंचे भावविश्व’ कार्यक्रम उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : खानदेशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान सहज, बोलीभाषेतील कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा वेध घेणारा ‘बहिणाईंचे भावविश्व’ हा कार्यक्रम बहिणाबाई चौधरी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई स्मृती संग्रहालयात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सुप्रसिद्ध लेखक, कवी व नाटककार किरण येले, तर अध्यक्षस्थानी विठ्ठल मंदिर संस्थानचे विलास हरी चौधरी होते. यावेळी बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कवी अशोक कोतवाल, सुभाष मराठे, विजय जैन, देवेंद्र पाटील, मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख विद्या व्यवहारे, प्रा. डॉ. योगेश महाले, विलास धनवे, डॉ. पुरुषोत्तम महाजन, प्रा. वर्षा उपाध्ये, का. ऊ. कोल्हे विद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. कोल्हे, जी. बी. पवार, चित्रा नारखेडे, मनिषा चौधरी, किशोर जाधव, चित्रकार विजय मोहन भाटिया, विशाखा देशमुख, हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘माह्यी माय सरसोती’ ही सामूहिक कविता सादर केली. रूपाली माळी यांनी ‘माझी मुक्ताई’, तर प्राची शेरे यांनी ‘अरे संसार संसार’ ही बहिणाबाईंची काव्यरचना सादर केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

बहिणाबाईंच्या साहित्यात सामान्य माणसाचे गहिरे तत्त्वज्ञान

कवी किरण येले यांनी बहिणाबाईंच्या साहित्याचे विविध पैलू उलगडून सांगताना त्यांच्या साहित्याचा संबंध संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या विचारपरंपरेशी जोडला. ते म्हणाले, “बहिणाबाई केवळ स्त्री कवयित्री नव्हत्या, तर त्या समाजाचे वाचन करणाऱ्या संवेदनशील साहित्यिक होत्या. माणूस हा केंद्रबिंदू ठेवून निर्माण झालेले साहित्यच चिरंतन राहते.”

बहिणाबाईंच्या साहित्याचा अनुभव सांगताना बहिणाई स्मृती संग्रहालयात आल्यावर “मंदिरात आल्याचे समाधान मिळते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बहिणाबाईंच्या कवितेत शेती, निसर्ग, कष्ट, संसार, नाती आणि सामान्य माणसाच्या जगण्यातील गहिरे तत्त्वज्ञान सामावलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीतील दगडामध्ये देव पाहण्याची भावना, माणसामाणसांमधील नाती आणि त्यातील भावबंध यांचा संदर्भ देत त्यांनी नात्यांकडे केवळ जोडणे-तोडणे या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यातील संवेदना जपण्याची गरज व्यक्त केली. ‘हम्प्टी-डम्प्टी’प्रमाणे नाती जोडली आणि तोडली म्हणजे त्याला खरे नाते म्हणता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

“ओठ आणि पोट भरण्यापलीकडे मन भरले पाहिजे,” असे सांगताना त्यांनी निसर्गाशी असलेले मानवी नाते आणि गुलमोहराच्या झाडाचे प्रतीकात्मक महत्त्व अधोरेखित केले. कबीर, तुकाराम आणि बहिणाबाई यांनी समाजाकडे केवळ पाहिले नाही, तर समाजाचे अंतरंग अनुभवले आणि ते आपल्या शब्दांतून व्यक्त केले, असे त्यांनी सांगितले.

आपण जे समजतो, अनुभवतो आणि जगतो, ते कविता, लेखन अथवा अन्य सर्जनशील माध्यमातून व्यक्त केले पाहिजे, असे आवाहनही कवी येले यांनी केले. यावेळी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कवितांचेही विवेचन केले.

बहिणाबाईंचा साहित्यवारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प

प्रास्ताविकात गिरीष कुलकर्णी यांनी खानदेशच्या साहित्य-संस्कृतीचे जतन, बहिणाबाईंच्या साहित्याचे निरंतर जागरण आणि त्यांचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘बहिणाईंचे भावविश्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बहिणाबाई आणि महात्मा गांधी यांच्या भेटीचा प्रसंगही उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील तायडे, ज्ञानेश्वर सोनार, प्रदीप पाटील, शरद धनगर, समाधान महाजन, अमोल भोलाणकर, विवेक चौधरी व हितेंद्र चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रा. गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले, तर गिरीष कुलकर्णी यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button