सामाजिकजळगाव

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, (प्रतिनिधी) शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची कास धरत शेतीत नवनवीन प्रयोग करून प्रयोगशीलता अंगीकारली पाहिजे. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि स्वतः निर्यातक्षम बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, गट विकास अधिकारी श्वेता पालवे, आत्माराम जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांसह महिला बचत गट प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे नेतृत्व होते. त्यांनी राज्यात एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक विकास घडवून आणला. शेतीतील सुधारणा व हरित क्रांतीतही त्यांचा मोठा वाटा होता.

जिल्हाधिकारी यांनी शेतीतील सध्याच्या समस्यांवर प्रकाश टाकताना घटती भूजल पातळी हा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले. भूजल पातळी वाढवण्यासाठी जल पुनर्भरण उपक्रम अत्यंत गरजेचे असून, जिल्हा परिषदेने यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे त्यांनी नमूद केले. जलतारा यासारखे उपक्रम शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.पेरणीच्या वेळी आंतरपीक पद्धतीचा अवलंब, गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा वापर व रासायनिक खतांचा मर्यादित वापर यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button