
- शिवाजी नगर व एमआयडीसी परिसरातील गरजू कुटुंबीयांना दिलासा
- संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट आणि एमबीए विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर, एमआयडीसी परिसर तसेच रेल्वे व बसस्थानक परिसरातील गरजू कुटुंबीयांना वाढत्या थंडीनिमित्त उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. थंडीमुळे सर्वाधिक त्रास होणाऱ्या निराधार बालक व महिलांना या उपक्रमातून मोठा दिलासा मिळाला. विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता दाखवत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक आणली. हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
उपक्रमाच्या सुरुवातीला संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देतो. सामाजिक जाण, जबाबदारीची भावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी महाविद्यालयात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. समाजासाठी काही करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले जाईल. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांनी दाखवलेला उत्साह पाहून मला अभिमान वाटतो. सामाजिक जबाबदारीची जाणीव हीच खऱ्या शिक्षणाची खरी ओळख आहे, असे प्रा. डॉ. अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईटचे सुजल परदेशी, सेजल बाहेती, वंश कांकरिया, सिद्धांत सुरवाडे, विवेक भंगाळे, रिचर्ड पिंडू, नेहा वाणी, मोनालिसा साहू, प्रियांका शर्मा, आलेस वाघडिया, कुमुद बर्डे, अस्मिता दुसाने, संस्कृती लगड, रोशनी जैन, चेतना काकडे, देवाशिष चौधरी हे विद्यार्थी सहभागी झाले तर उपक्रमाचे नियोजन व समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी प्रभावीपणे पार पाडले. या सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.




